अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था समाजाला सक्षम नेतृत्व देणारी संस्था -सूर्यकांत पाटील

      अ अलिबाग, दि.- देशभरात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या आगरी समाजाच्या असंख्य संघटना आहेत.  परंतु  समाजाला एकसंघ करणारी, समाजाचा सर्वांगीण विकास साधणारी, तरुणांचे व महिलांचे सक्षमीकरण करणारी,  समाजाचा आतापर्यंत पुढे आलेला विकृत चेहरा पुसण्यासाठी समाजाच्या चांगल्या, पुरोगामी प्रथा-परंपरांचा प्रचार आणि प्रसार करणारी, समाजावरील अन्यायाविरोधात लढणारी आणि हे सगळं करताना राजकारण बाजूला ठेवणारी, नि:पक्षपाती, मध्यवर्ती अशी राष्ट्रीय पातळीवर समाजाला नेतृत्व देणारी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था ही एकमेव संस्था आहे. असा दावा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केला आहे.  ते संगमेश्वर-मुळे (तालुका अलिबाग) येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.
              आज तरुणांपुढे विशाल भविष्य उभे आहे, नोकरी-धंद्याच्या अभावी बेरोजगार वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे. आधीच शिक्षण घेण्यासाठी तरुणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांकडे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य नाही. जगण्याचं एकमेव साधनही कवडीमोल किमतीने घेऊन शासन समाजाला विस्थापित करू लागलाय.  मुंबई नंतर नवी मुंबई आणि आता ठाणे, रायगड, पालघर येथूनही तिसऱ्या मुंबईच्या निमित्ताने समाजाला हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  हा प्रकार म्हणजे एकंदर आगरी माणसाचं अस्तित्वच मिटवून टाकण्याचं षडयंत्र आहे. असा गंभीर आरोपही श्री. पाटील यांनी केला आहे.
            अलिकडच्या काळात स्थानिक भूमिपुत्र पुरता नागवला आहे.  त्याच्या आया-बहिणींवर परक्यांची धुणी-भांडी करण्याची पाळी आली आहे. तर पुरुषांवर इतरांच्या सोसायट्यांमध्ये वाचमनची चाकरी करावी लागत आहे. या विदारक परिस्थितीचे राजकारण्यांना मात्र कसलही सोयरसुतक नाही. म्हणून आता समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी संघटित होऊन संघर्ष करण्या विना गत्यंतर उरले नाही. असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
          यावेळी संगमेश्वर, मुळे,  मानी, नेहुली, भूते येथील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर स्थानिक व्यक्तींचा देखील गौरव करण्यात आला.  महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी हा कार्यक्रम स्वर्गीय के.  पी.  पाटील आणि पाटील, थळे, म्हात्रे कुटुंबीयांतर्फे आयोजित करण्यात येत असतो.
            कार्यक्रमाला अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे अलीबाग शाखेचे प्र. अध्यक्ष राजेंद्र वाघ,  परशुराम म्हात्रे,  जी डी पाटील,  प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या भारती दीदी,  यशवंत थळे,  काशिनाथ पाटील अरविंद मात्रे रमेश पाटील आदी मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             सूत्रसंचालन रमेश धुमाळ यांनी अत्यंत खुसखुशीत शैलीत केले.